आरोग्य व शिक्षण
पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा बनणार विदेशात शास्त्रज्ञ….!
बीड, दि.२ – येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल उत्तम हजारे हा विदेशात शास्त्रज्ञ बनणार असून, तैवानमधील एनडीएचयु विद्यापिठात तो उच्च शिक्षण घेऊन, संशोधन करणार आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातून नोबेल हजारे या एकमेव विद्यार्थ्यांची तैवानमधील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. नोबेल हजारे यांच्या या यशाबद्दल बीड जिल्हयातून सर्वत्र अभिनंदन होत आहे .
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा विद्यार्थी असलेला नोबेल हजारे यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयात झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण बलभीम महाविद्यालयात झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर, पीएचडीसाठी झालेल्या पुर्व परिक्षेत नोबेल हजारे हा मुंबई विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठ व नांदेड विद्यापीठासाठी पात्र झाला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रो. बी.एन. डोळे सर, एम. डी. सिरसाट सर ,प्रो. अनिता मुरुगकर मॅडम, मेंटार विजयकिरण नरवडे सर ,प्रो. भरत मडावी सर , प्रो. ताटे बी. टी.सर तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( रुसा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यानंतर, नोबेल हजारे यांची तैवान देशातील नॅशनल डाँग युनीव्हरसिटी ( एनडीएचयु) विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे, एनडीएचयु विद्यापिठातील प्रोफेसर युआन रॉन यांच्या मार्गदर्शनाखाली नोबेल हजारे हा संशोधन करणार आहे. नोबेल हजारे हा पुढील महिन्यात उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार आहे. नोबेल हजारे यांच्या या यशाबदलऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व इतर गुरुजनांनी अभिनंदन केले आहे.
सिरसमार्गचे विदेशात पहिले पाऊल
सिरसमार्गचे भूमीपूत्र असलेले ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल हजारे यांची विदेशात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने, सिरसमार्ग ग्रामस्थांनी आंनदोत्सव साजरा केला आहे. सिरसमार्ग व परिसरातून उच्च शिक्षणासाठी जाणारा नोबेल हजारे हा पहिला विद्यार्थी आहे.
दोन्ही मुले झाली डॉक्टर
पत्रकार उत्तम हजारे यांनी पत्रकारिता करताना मुलांच्या शिक्षणावर भर देऊन, दोन्ही मुलांना उच्च शिक्षीत केले आहे, त्यांचा एक मुलगा डॉ. सुजीत हा एमबीबीएस पूर्ण करून, सध्या लातूर येथे इंटर्नशीप करीत आहे तर दुसऱ्या मुलाने संशोधनात डॉक्टरकीला विदेशात गवसणी घातली आहे.
पुढील महिन्यात जाणार विदेशात
नोबेल हजारे यांनी युरोपमधील अनेक विद्यापिठाच्या परिक्षा दिल्या आहेत, येत्या दि.15 जून रोजी युरोपमधील परिक्षेचा निकाल लागणार आहे. नोबेल हजारे हा पुढील महिन्यात विदेशात उच्च शिक्षणासाठी रवाना होणार आहे . नोबेलच्या उच्च शिक्षणासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.