केज दि.6 – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने केज शहरातील प्रभागा नुसार घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून यासाठी एकूण 14 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्वेक्षणाची संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यानुसार केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील क्रांतीनगर, खरेदीविक्री संघ परिसर, वकिलवाडी, रोजा मोहल्ला, भीमनगर, राममंदिर, शुक्रवार पेठ, गौसपाक नगर, शिक्षक कॉलनी, कोकीसपीर, बसस्थानक परिसर, समर्थनगर इत्यादी भागात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणात प्रत्येक घरी जाऊन आरोग्यसेतु ऍप डाउनलोड करायला लावणे, घरातील कुणाला गंभीर आजारांसह सर्दी, ताप, खोकला इत्यादी माहिती संकलित करणे, बाहेर गावावरून आलेल्या सदस्यांची माहिती घेऊन त्यांना होम कॉरंटाईन करणे, इझीऍप मध्ये माहिती संकलित करणे इत्यादी गोष्टींचा सर्व्हे करावयाचा आहे. तसेच परिसरातील खाजगी दवाखान्यात आलेल्या सर्दी, ताप, खोकला इत्यादी रुग्णांची माहिती घेणे व मेडिकल स्टोअर्स वरून जर कुणी सर्दी, ताप, खोकल्याची औषधी घेऊन गेले असतील तर त्यांचीही माहिती संकलित करावयाची आहे. तसेच ही सर्व माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला कळवायची आहे.
दरम्यान डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी खरी माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच कांही लक्षणे आढळून आल्यास न घाबरता न लाजता आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.