व्हायरल
केज तालुक्यातील कित्येक रस्ते होतात पावसाळ्यात बंद….!
केज दि.२९ – तालुक्यातील ग्रामीण भागात आजही मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. वीज आणि पाण्यासह रस्त्यांच्या समस्या कायम आहेत. कित्येक गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. तर वाड्या आणि वस्त्यावरील रस्ते तर पावसाळा सुरू झाला की बंद होतात असे चित्र निर्माण होते. अशीच अवस्था सोनी जवळ्यातील भवानी वस्ती ते ढाकेफळ रस्त्याची झालेली आहे.
गावापासून एक किमी अंतरावर भवानी वस्ती आहे. त्या वस्ती पासुन ढाकेफळ रस्ता हा दोन किलो मीटर अंतराचा आहे. या दोन किलो मीटर वर अनेक शेतकरी वास्तव्य करतात. तर कित्येक शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करावी लागते.परंतु सदरील रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असल्याने चक्क चिखलातुन मार्गक्रमण करावे लागत आहे. तर याच रस्त्यावर दोन तलाव असल्याने पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साचत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकर्यांना व त्यांच्या पाल्यांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत आहे. कित्येक वर्षांपासून सदरील रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी होत असतानाही स्थानिक तसेच मतदार संघातील प्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत.
दरम्यान, आता तरी सोनिजवळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच आमदार नमिता मुंदडा यांनी लक्ष देऊन रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.