संपादकीय
केज शहरातील उमरी रोडच्या कामावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही….?
केज दि.११ – एखाद्या रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर त्या रस्त्यावरून वागणाऱ्या रहिवाशांना थोडी तरी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र उमरी रोडचे काम सुरू आहे आणि त्या रोडवरील रहिवाशांना सध्या वाहनेच काय तर पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सदरील प्रभागात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
मागच्या दोन महिन्यापूर्वी केज शहरातील उमरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला दोन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी रस्ता खोदायला सुरुवात केली. मात्र रस्ता खोदत असताना सदरील प्रभागात राहणाऱ्या रहिवाशांच्या किमान वागण्याची व्यवस्था करणे हे संबंधित यंत्रणेचे काम आहे. मात्र जागोजागी रस्ता खोदून ठेवला असल्याने व अंतर्गत गल्ल्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांच्या तोंडावर कसल्याही प्रकारचा मुरूम अथवा जेसीबीने ब्लेड न मारता तसाच ठेवल्याने सदरील गल्ल्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहने तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा मुश्किल झालेले आहे.
वास्तविक पाहता दिवसभर खोदकाम केल्यानंतर किमान काम बंद करताना रहिवाशांना आपापल्या गल्ल्यांमध्ये जाता येईल, वाहने नेता येतील अशा प्रकारची अंतर्गत गल्ल्यांच्या तोंडावर तात्पुरती व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र दिवसभर काम केल्यानंतर मोठ-मोठे खड्डे आणि दगड गोटे तसेच रस्त्याच्या मधोमध सोडून जेसीबीच्या काम करणारे निघून जातात. कारण त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण दिसत नाही. आणि त्याचा सामना करावा लागतो सदरील प्रभागात राहणाऱ्या रहिवाशांना….! त्यामुळे ”काम कवडीभर अन परेशानी ढीगभर” अशी अवस्था झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील प्रश्नाकडे लक्ष देऊन काम करणाऱ्या गुत्तेदाराला समज देण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.