संपादकीय
दिवसेंदिवस रहदारी वाढणार आहे, थातूर मातूर काम करणे टाळा…..!
केज दि.19 – शहरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांपैकी सुरू असलेल्या उमरी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. वास्तविक पाहता दिवाळीनिमित्त मागच्या काही दिवसापासून काम बंद जरी असले तरी आता सोमवारपासून कामाला गती येईल असे सांगितले जात आहे. मात्र सदरील कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित्ता झाल्याचे सक्रिय न्यूज च्या माध्यमातून समोर आणल्यानंतर झालेल्या कामांमध्ये काही सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून उमरी रस्त्याचे काम सुरू आहे कित्येक वर्षांपासून प्रलंबित पडलेला हा प्रश्न निकाली लागल्याने सदरील प्रभागातील रहिवाशी समाधानी आहेत. परंतु दिवसेंदिवस सदरील प्रभागात रहदारी वाढत आहे. अनेक रहिवाशी घरांचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे आता जेवढ्या प्रमाणामध्ये त्या रस्त्यावरून वाहतूक होते त्याच्या कितीतरी पटीने येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये रहदारी वाढणार आहे. त्यामुळे हा रस्ता गुणवत्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र नाली बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित्ता दिसून आली. कित्येक ठिकाणी अतिक्रमण वाचवण्यासाठी नाल्यांना वळणे देण्यात आले. त्यामुळे त्याच ठिकाणी कामाचा दर्जा ढासळला. एवढेच नव्हे तर नाल्यांचे बांधकाम ज्या प्रमाणात पक्के व्हायला हवे होते तसे न झाल्याने काही ठिकाणी नाल्या ढासळल्या सुद्धा. तसेच रस्त्याची 33 फुटाची रुंदी ही कित्येक ठिकाणी कमी झाली आणि या सर्व प्रश्नांची चर्चा सदरील प्रभागातील नागरिक तक्रारीच्या स्वरूपात करू लागले. मात्र सदर रस्त्याचे काम होणे हे तर आवश्यक आहे. त्याचबरोबर गुणवत्ता पूर्ण कामही होणे गरजेचे आहे.
सदरील काम सुरू होण्याच्या अगोदर पासूनच काही अडथळे येत गेले. यामध्ये काहींनी अतिक्रमण वाचवण्याचे प्रयत्न केले तर काहींनी वेगळीच काहीतरी मागणी केल्याची चर्चा सुरू झाली. यामध्ये ज्या प्रभागातील रहिवाशांच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या कामांमध्ये नेमके अडथळे निर्माण कोण करते ? आणि कोण कशाची मागणी करते हेही समोर आले पाहिजे. कारण काम कुठलेही जरी असले तरी शंभर टक्के नियम जरी नाही लागू झाले तरी मात्र मागच्या अनेक वर्षांची हेळसांड पाहता काम दर्जेदार व्हावे अशी इच्छा नागरिकांचीच नव्हे तर काम करून घेणाऱ्यांची, काम करणाऱ्यांची आणि जे कामाचे श्रेय घेणार आहेत त्यांची असायला पाहिजे. मात्र काम सुरू होण्याच्या अगोदरच जर यामध्ये कुणी कुणाचे हितसंबंध जपत असेल आणि कुणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तसेच काही वेगळी ”अर्थपूर्ण” मागणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर असे झारितले शुक्राचार्य जनतेच्या समोर नक्कीच आले पाहिजे. आणि कोण नेमकं दबावाला बळी पडत आहे ? आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव येतोय हे त्यांनी जरी समोर येऊन स्पष्ट नाही केले तरी मात्र एक ना एक दिवस अडथळे आणणारे समोर येणारच आहेत.
दरम्यान, सामान्य नागरिक विनाकारण तक्रारी करत नाहीत. त्यांना जे समोर दिसते ते मांडत असतात. त्यामुळे नाली बांधकामामध्ये जी कांही अनियमितता झाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणखीही वेळ गेलेली नाही. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाकड्या तिकड्या झालेल्या नाल्या सरळ करण्याचे मनावर घेतल्याचे बोलल्या जात आहे. तसे झाले तर ठीक अन्यथा सर्वसामान्य नागरिक जी अनियमितता दिसेल ती समोर आणणारच……!