केज दि.7 ( बळीराम लोकरे) – पाच वेळा रोहित्र जळाल्याने पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली. पिके माना टाकू लागल्याने शेतकरी हातबल झाला असून आता त्यांनी रोहित्र व्यवस्थित चालू दे रे म्हसोबाराया म्हणत देवाकडे धावा केला आहे .याच भावनेतून चक्क म्हसोबाला बोकड कापल्याचा प्रकार केज तालुक्यातील सुकळी येथे समोर आला.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत पंपांना विज अत्यावश्यक आहे. परंतु सतत रोहित्र जळत असल्याने पिके करपू लागली होती.जळालेले रोहित्र भरून आणले तर आठ दिवस पण टिकत नव्हता.एका महिन्यात एक नव्हे दोन नव्हे तब्बल पाच वेळा जळालेला रोहित्र वर्गणी करून दुरुस्त केला. शिवारातील पिके जगवण्यासाठी व शेतीपंपाला लागणाऱ्या विजेसाठी शेतकरी काहीही करायला तयार आहे हेच यातून दिसून येत आहे. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, ऊस इत्यादी पिके हे सिंचनावर वाढतात. त्यावरच उत्पन्नाचे गणित अवलंबून असते. पाणी नसेल तर पिके करपून जातात, त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. पाणी उपलब्ध असले तरी शेतातील डीपी कधी जळेल आणि कधी बत्ती गुल होईल याचा काही नेम नसतो. शेतातील डीपी एकदा नादुरुस्त झाल्यानंतर वर्गणी करूनच शेतकऱ्यांनी स्वतःहून रोहित्र भरून आणायचा दुरुस्त करायचा हा अलिखित नियम काही वर्षापासून रुढ झाला आहे. असाच प्रकार सुकळी शिवारातील एका डीपी बाबत घडला. तांत्रिक कारनामुळे तब्बल पाच वेळा रोहित्र जळाला. त्यामुळे कांही शेतकऱ्यांनी वर्गणी करून दुरुस्त केला आणि चक्क रोहित्राला बोकड कापून म्हसोबाला नैवेद्य दाखवून अन्नदान केले आहे. यापुढे तरी शेतातील विद्युत पंपांचा वीज पुरवठा सुरळीत चालेल ही श्रद्धा संबंधित शेतकऱ्यांनी ठेवली आहे. या श्रद्धेला म्हसोबा पावणार का? हे पाहावे लागणार आहे