ब्रेकिंग
देशभरात का लागल्यात पेट्रोल पंपांवर रांगा…?
मुंबई दि.2 – नवीन वाहन कायद्यात दुरुस्ती करा, यासाठी देशभरातले
ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. ट्रक
चालकांनी एखाद्या कायद्याला विरोध करणं ही गोष्ट तुम्हाला नवीन वाटली असेल. मात्र त्यामागे काय कारण आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात अनेक ठिकाणचे ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्रासह अनेक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालक आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलन केल. राज्यात काही ठिकाणीही आंदोलनं झाली आहेत.याआधी स्वतःची चूक असूनही एखादा
ट्रकचालक वाहन किंवा व्यक्तीला धडक देऊन पळून गेला, तर त्याला ३ वर्षांची कैद होती. नव्या कायद्यात १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला गेलाय. सरकार म्हणतंय की ट्रकचालकानं एखाद्याला धडक दिल्यास त्याला रुग्णालयात नेणं गरजेचं आहे, पण तो पळून जात असेल तर दंडात्मक कारवाई योग्यच ठरते. ट्रकचालक म्हणतायत की अनेकदा चूक नसतानाही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेला जमावाकडून मारहाणीची भीती असते. सरकार म्हणतं की ट्रक अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे, म्हणून कठोर नियम बनवणं योग्य. चालक म्हणतायत की हेतू चांगला आहे, मात्र अपघातात चूक कुणाची हे शोधण्याची यंत्रणाच नाही, अनेक अपघातात कायम मोठ्या वाहनाची चूक धरली जाते. माहितीनुसार, देशात या घडीला २८ लाखांहून जास्त ट्रक धावत आहेत. अंदाजे 80 लाख लोक ट्रकचालक म्हणून काम करतात. दूध- पालेभाज्या, फळं, शेतमाल, पेट्रोल-डिझेल- बांधकाम साहित्य, व्यावसायिकांच्या वस्तू, अशा व्यावसायिक वाहतुकीत सर्वाधिक वाटा ट्रकचालकांचा आहे. त्यामुळे नव्या कायद्यात अनेक त्रुटी असून त्या सुधाराव्यात अशी मागणी ट्रकचालकांची आहे. सरकारचं शिष्टमंडळ आणि ट्रकचालक संघटनांमध्ये १० जानेवारीला बैठक होणार आहे. त्यावेळी काय तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांची वाहतूक ही मोठमोठ्या ट्रॅकरच्या माध्यमातूनच होते. पण आता या इंधनांच्या टँकर चालकांनीदेखील या संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच भीतीमुळे राज्यातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर आता गर्दी व्हायला लागली आहे.केज, कळंब, अंबाजोगाई, लातूर इत्यादी शहरात रात्री उशिरापर्यंत रांगच रांग लागली होती.