महाराष्ट्रराजकीय
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष…..!
मुंबई दि.10 – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत. पण त्याआधी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या ऐतिहासिक निकालाचं वाचन करणार आहेत. या निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये अशी चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याचबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सरकारकडून काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ही अस्थिरता निर्माण झालीय. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बहाल केला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार, राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. नार्वेकरांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजूचं लेखी म्हणणं ऐकून घेतलं. दोन्ही बाजूच्या आमदारांची उलटसाक्ष देखील नोंदवण्यात आली. त्यानंतर उद्या अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधी ते काय निकाल जाहीर करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलंय.