हवामान
राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज….!
बीड दि.२५ – राज्यात सध्या ऊन आणि गारव्याचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तर राज्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.