ब्रेकिंग

बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदार संघात हालचाली वाढल्या…..!

12 / 100

केज दि.४ – अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत. त्यात प्रत्येक पक्ष सत्तेवर विराजमान होण्यासाठी निकराचे प्रयत्न करताना दिसत आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप, विकास कामाच्या वल्गना,  विरोधकांचे तसेच सत्ताधाऱ्यांचे अपयश यावर रणकंदन सुरू आहे. मात्र बीड जिल्ह्यात सर्वात जास्त हवा गरम झालेली आहे ती केज विधानसभा मतदारसंघाची. आणि तशा घडामोडीही घडण्याचे संकेत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना येऊ लागलेले आहेत.

               बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात जास्त चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ हा केज ठरू लागलेला आहे. सध्या केज विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे आणि आमदार म्हणून नमिता मुंदडा ह्या आपण किती विकास कामे केली याचा पुनरुच्चार करत विधानसभा मतदारसंघांमध्ये छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी संपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्या रनिंग आमदार असल्याने पक्ष त्यांना उमेदवारी देतो की डावलतो हे पहावे लागणार आहे. मात्र या व्यतिरिक्त ज्या राजकीय व्यक्तींना आमदारकीचे स्वप्न पडू लागलेले आहेत त्यामध्ये माजी आ. संगीता ठोंबरे यांच्यासह डॉ. अंजली घाडगे, रमेश गालफाडे यांची नावे प्रामुख्याने समोर येऊ लागलेले आहेत. आणि ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामालाही लागलेले आहेत. 2014 ते 19 या पंचवार्षिक मध्ये संगीता ठोंबरे या विधानसभेच्या सदस्य होत्या. परंतु 2019 च्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांच्या ऐवजी ऐनवेळी भाजपात आलेल्या नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आणि त्या आमदारही झाल्या. मात्र येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संगीता ठोंबरे यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून जनसंपर्कासह बड्या बड्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. सध्या त्या दावेदारी भाजपाकडून दाखवत असल्या तरी भाजपाने तिकीट नाही दिले तरी मी निवडणूक लढवणारच अशा बोलून दाखवत आहेत. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
             तर दुसरीकडे डॉ. अंजली घाडगे यांनीही केज मध्ये तळ ठोकला असून मतदारसंघात त्याही लोकांसमोर जाऊ लागलेल्या आहेत. आणि एका प्रमुख पक्षाची उमेदवार असेल अशा बोलताना दिसत आहेत. अद्याप कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल हे जरी स्पष्ट केले नसले तरी काम सुरू केलेले आहे. तर बहुजन विकास परिषदेचे रमेश गालफाडे यांनीही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा निर्धार केल्याने त्यांनीही जनसंपर्कासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्यावर भर दिला आहे. मागच्या चार दिवसांपूर्वीच रमेश गालफाडे यांनी केज शहरात जनसंवाद मेळावा घेतला आणि या मेळाव्याला शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी उपस्थित होती. गालफाडे यांनीही एका प्रमुख पक्षाकडून आपली उमेदवारी असेल असे सुतवाच केल्याने ते नेमके कोणत्या पक्षाशी जवळीक साधून उमेदवारी मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या जागी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अडीच वर्ष आमदार म्हणून केज विधानसभा मतदारसंघात आपले वलय निर्माण केलेले आहे. शरद पवार यांच्याशी पहिल्यापासून एकनिष्ठ असलेले पृथ्वीराज साठे हे प्रमुख दावेदार असल्याचे त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. अतिशय संयमी आणि मितभाषी अशी त्यांची विधानसभा मतदारसंघात ओळख असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदार त्यांच्या संपर्कात आहे.
                     दरम्यान या प्रमुख चेहऱ्यांव्यतिरिक्त आणखीही काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली मंडळी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये डॉ. राहुल शिंदे तसेच नगराध्यक्ष सीता बनसोड यांचीही नावे अधून मधून समोर येत असल्याने नेमके कोणते उमेदवार महायुती तसेच महा विकास आघाडी कडून पुढे येतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु सध्यातरी केज विधानसभेचे वातावरण तापलेले असून अनेकांनी आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडणार असून अनेकांचे आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेशांचीही मुहूर्त ठरले असल्याचे बोलल्या जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close