आपला जिल्हा
मल्टिस्टेटच्या ठेवीदारांना न्याय द्या….!
बीड दि.६ – मागच्या काही महिन्यांपासून मल्टीस्टेट मध्ये पैसे गुंतवलेल्या ग्राहकांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. मोठ्या आशेने हजारो ग्राहकांनी मल्टीस्टेट मध्ये आपले पैसे ठेवले. परंतु अचानक अनेक मल्टीस्टेट चे दिवाळे निघाल्याने कित्येक ग्राहक अक्षरशः आर्थिक आणीबाणीत आलेले आहेत. आणि यावरच काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी यासाठी राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी संसदेत हा मुद्दा लावून धरला.
मराठवाडा व विशेषतः बीड जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी, नोकरदार, पेन्शनर यांना मल्टीस्टेट चालकांनी जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेकांच्या ठेवी ठेवून घेतल्या व आता हे मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाले आहेत. मात्र यामध्ये सर्वसामान्य लोक भरडली जात आहेत. कोणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले होते, कोणी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसे साठवले होते तर कोणी रात्रंदिवस कष्ट करून पैसे ठेवले होते. मात्र आता या मल्टीस्टेट चे दिवाळे निघाले आहे. त्यामुळे ज्यांनी या मल्टीस्टेट ला परवानग्या दिल्या त्यांनी या लोकांचे पैसे परत देण्याची देखील जबाबदारी घेतली पाहिजे व सरकारने त्या लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांनी या महत्वाच्या मुद्यावर आज राज्यसभेत आवाज उठवला. त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.