बनावट नोटा चलनात वापरताना दोघांना पकडले…!
बीड दि.१७ – पाचशे रूपयांच्या बनावट नोटा चलनात वापरतांना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्याकडून पाचशेच्या चार नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून ही कारवाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या टीमने रविवारी (दि. १५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील कागजी दरवाजा भागात केली. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात असून काही नावे देखील समोर येऊ शकतात.
बीड शहर ठाण्याचे पोलीस कर्मचारी मनोज परझणे, अशफाक सय्यद, शहंशाह सय्यद हे रविवारी रात्री बहिरगंज चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन इसम बनावट नोट घेवून त्या नोटा चालवण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यवरून पोलीस निरीक्षक शित्तलकुमार बल्लाळ यांना याची माहिती दिल्यानंतर कागजी दरवाजा भागात एका किराणा दुकानाजवळ सापळा लावून त्याठिकाणी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेवून आलेल्या दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाचशे रूपयांच्या चार बनावट नोटा आढळून आल्या.
याप्रकरणी पोलिसांनी आकाश रमेश जाधव (वय २२ सोमेश्वर नगर, बीड) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मनोज परजणे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.