बीड दि.23 – कोरोना संसर्ग राज्यात सुरू असला तरी राज्य सरकारच्या वतीने कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यात लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, व्यापाऱ्यांना लक्षणे नसतील, तर त्यांच्या चाचण्या करू नका, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
रुग्णालयात येण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अत्यावश्यक शस्त्रक्रियेच्या रुग्णांची चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तिथे अँटिजन चाचणी करण्यात यावी, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.अँटिजनमध्ये निगेटिव्ह आलेले, पण लक्षणे असलेले नागरिक, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्कमध्ये असलेले आणि विदेशातून आलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, असं सरकारने आदेशात नमूद केलंय.कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला लाळेचे नमुने घेऊन चाचण्या केल्या जात होत्या. यात एका चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो, तर अहवाल चोवीस तासांनंतर मिळतो. दरम्यान, गेल्या महिन्यापासून अँटिजन पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे.