ब्रेकिंग
प्रतीक्षा संपली, विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर….!
मुंबई दि.१५ – मागच्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार अगदी डोळ्यात तेल घालून निवडणुकांच्या तारखांची वाट पाहत होते. मात्र आता या सर्वांची प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे.
पत्रकार परिषदेत अगदी इत्यंभूत माहिती दिली. निवडणुका कशा होतील, किती मतदान केंद्र असतील, महिलांकडून चालवल्या जाणारी मतदान केंद्र किती असतील, केंद्रांवर कशाप्रकारे सीसीटीव्ही च्या माध्यमातून निगराणी राखली जाईल याची सविस्तर माहिती दिली.तसेच त्यांनी राज्यातील सुमारे 11 राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या आणि त्यानुसार आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होईल आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर ला होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी असो की महायुती यांच्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अनेकांचे इंकमिंग, आउटगोइंग सुरूच आहे. मात्र निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने या सर्व घडामोडींना वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.