व्हायरल
विश्लेषकांचा कधीच पुढे न आलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हवेत बार….!
केज दि.१७ – निवडणूक घटीका आता समीप आली आहे. अनेक जण इच्छुक उमेदवार अगदी देव पाण्यात घालून तिकीट वाटपाच्या रांगेत जणूकाही प्रसादाच्या रांगेत उभे आहेत अशी प्रतीक्षा करत आहेत. गावोगाव जाऊन पंक्तीचे आश्वासन देऊन आले आहेत. आणि आता मतदारांनाही उमेदवारांपेक्षा भलतीच लगीनघाई झाल्याचे दिसून येत असून प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज वर्तवण्यामध्ये मशगुल झालेले आहेत.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. मात्र मंडपाची तयारी अद्याप सुरू असून पुन्हा लग्न घटी समीप आली आहे आणि आता आपण बोहोल्यावर चढा असे म्हणणारे अद्यापही मौन बाळगून आहेत. मागच्या दोन-तीन महिन्यांपासून इच्छुकांनी साज चढवलेला आहे आणि गावागावात, वाड्या वस्त्यांवर जाऊन आश्वासनांची खैरात वाटलेली आहे. आश्वासन म्हटलं की भविष्यकाळ असे म्हणतात आणि अशी आश्वासने कित्येक इच्छुकांनी दिलेले आहेत. आश्वासने दिल्यानंतर वऱ्हाडी मतदारही वऱ्हाड्याप्रमाणे कोण बोहल्यावर चढणार आहे या उत्सुकतेमध्ये आहे. मात्र प्रत्येक पक्षाकडे जागा एकच, त्यामुळे कोण किती मानपान करतो आणि कोण दिलेल्या आश्वासनाच्या पंक्तीमध्ये शेवटपर्यंत तग धरतो यावरच त्याला बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे.
आता जवळजवळ सर्व तयारी झाली असून केवळ इच्छुकांच्या यादीमधून एकाची निवड करण्याचे मोठे काम वरिष्ठांना करावे लागणार आहे. मात्र कुठल्याही एकाची निवड करणं हे एवढं सोपं काम नाही. त्यामुळे सर्वांनाच चाळणीतून चाळून तर घ्यावे लागणार आहे त्याचबरोबर दुर्बिणीतूनही पाहावे लागणार आहे. अनेकांनी जास्तीत जास्त दुर्बीण आपल्याकडेच आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे बार उडवले आहेत. मोठ्या थाटामाटात बोहल्यावर चढण्या अगोदरच वाजंत्री कलकलाट पक्षश्रेष्ठींच्या कानापर्यंत जाईल असा केलेला आहे. मात्र केवळ कलकलाट करून पक्षश्रेष्ठींचे कान तृप्त होतील असे नाही. तर एकदा बोहल्यावर चढवल्यानंतर तो कशाप्रकारे तग धरून राहील याची फुटपट्टी ही पक्षश्रेष्ठी लावत आहेत. काही इच्छुकांनी तर मध्येच रणांगण सोडून पळ काढला आहे. केवळ दोन ते तीन इच्छुक उमेदवार सध्या तग धरून आहेत आणि प्रत्येक इच्छुक मलाच बोहल्यावर चढवणार आहेत असा शब्द दिल्याचे गावोगाव जाऊन सांगत आहेत. मात्र श्रेष्ठींच्या मनात कोण भरले ? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांमध्ये केज विधानसभेच्या बोहंल्यावर चढण्याचा मान कुणाला मिळतो हे इच्छुकांपेक्षा काही तथाकथित राजकीय विश्लेषक करताना दिसत आहेत. तर मतदारही इच्छुकांचे जसे वारे आहे तसे शब्दरूपी उधळण करत आहेत. अशा या विश्लेषणामध्ये आणि अंदाजामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मात्र पोटात गोळा उठल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे इच्छुकांची जरी झोप उडाली असली तरी तथाकथित विश्लेषक आणि स्वयंघोषित अनुभवी आपापल्या परीने आणि कधीच पुढे न आलेल्या सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या पातळीवर उमेदवारी घोषित करताना दिसत आहेत. पाहुयात कुणाचे बाशिंग ठरते जड अन कुणाचे हलके….!