ब्रेकिंग
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर जाहीर केला निर्णय…..!
केज दि.२० – मागच्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत. मात्र त्यांची जी प्रमुख मागणी आहे ओबीसीतून आरक्षण मिळवण्याची त्यावर सरकारने कुठल्याच प्रकारचा निर्णय न घेतल्याने आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी काही ठोस निर्णय घेतले आहेत.
यामध्ये आपला उमेदवार जिथे निवडून येण्याची खात्री आहे तिथेच उमेदवार उभा करायचा, आरक्षित मतदारसंघांमध्ये आपल्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्यायचे असे स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आणि यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात काय करायचे ? याबाबतीत उपस्थितांबरोबर चर्चा करून काही निर्णय जाहीर केले. यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे तिथेच उमेदवार उभे करायचे तर आरक्षित असलेल्या मतदारसंघांमध्ये आपण उमेदवार उभा न करता आपल्या विचारांचा जो उमेदवार असेल त्याला आपले मते द्यायची अशी सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली.
तसेच आपण ज्यांना पाठिंबा देणार आहोत त्या उमेदवाराने आम्ही आरक्षणाची मागणी करू असे बॉण्डवर लिहून दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहोत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असेही त्यांनी सांगितले. समीकरण नाही जुळले तर पुन्हा काय करायचं ? याचा निर्णय 29 तारखेला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उमेदवार एका समाजावर निवडून येत नाही त्यामुळे इतर समाजाच्या मतांचेही समीकरण जुळवून घेतलं पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. आणि उमेदवारी अर्ज भरून ठेवण्याच्या सूचनाही केल्या त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हे निर्णय निर्णायक ठरतील असे दिसून येत आहे.