#Election
प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर जनता मला स्वीकारेल – संगिता ठोंबरे
डी डी बनसोडे
November 1, 2024
केज दि.१ – लोकप्रतिनिधी म्हणून लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करायचे असेल तर प्रयत्न झाले पाहिजेत, आणि ते प्रयत्नही प्रामाणिक असले पाहिजेत. असाच प्रामाणिक प्रयत्न माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात केला आणि पुन्हा त्याच प्रामाणिकपणावर जनतेच्या दरबारामध्ये त्या उतरल्या आहेत.
माजी आमदार संगीता ठोंबरे यांना भारतीय जनता पार्टी कडून 2014 ते 2019 पर्यंत केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्या नवख्या जरी होत्या तरीही उच्चशिक्षित असल्याने अवघ्या काही महिन्यांमध्येच त्यांनी प्रतिनिधित्व म्हणून काय करायला पाहिजे हे समजून घेतले आणि विधानसभा मतदारसंघातील नागरिकांपुढे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करू लागल्या. यामध्ये कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न त्यांनी हाताळले. यामध्ये नेकनूर येथील बस स्थानकाचा प्रश्न असेल किंवा आंबेजोगाई येथील बस स्थानक इमारतीचा प्रश्न असेल हे मोठे प्रश्न त्यांनी पूर्णत्वास नेले. एवढेच नव्हे तर केज शहरामध्ये पंचायत समिती कार्यालय इमारतीच्या मान्यतेसाठीही त्यांनी पाठपुरावा केला आणि ती मंजुरी करून घेतली.
मात्र यामध्ये सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे पाण्याचा. केज विधानसभा मतदारसंघातील जनतेला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी तात्पुरत्या योजना करून भागणार नाही असा विचार डोक्यात घेऊन त्यांनी थेट उजनीचे पाणी केज विधानसभा मतदारसंघांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि हा प्रश्न जर सुटला तर तो माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरेल असे त्या वारंवार बोलून दाखवतात. मात्र पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाले आणि ते पूर्णत्वास जाण्याच्या दरम्यान त्यांना आमदारकीने हुलकावणी दिली म्हणून आजही ते प्रश्न प्रलंबित आहेत.
दरम्यान पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उजनीच्या पाण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या इच्छेने त्या केज विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरल्या आहेत. कुठल्या पक्षाकडून तिकीट जरी मिळाले नसले तरी जनता हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि तो माझ्या प्रमाणित प्रयत्नांना नक्कीच प्रतिसाद देईल. तसेच माझ्या मनामध्ये केज विधानसभा मतदारसंघासाठी जे काही प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत त्याला नक्कीच साथ देईल असा विश्वास व्यक्त करत त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रचार दौऱ्यादरम्यान संगीता ठोंबरे यांना मोठा प्रतिसाद मिळत असून उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीशी राहण्याचा मनोदय मतदारही व्यक्त करत आहेत.