#Election
जे जे शब्द दिले ते पूर्ण करून दाखवले – आ. नमिता मुंदडा….!
केज दि.६ – मागच्या 27 वर्षांपासून केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हा सार्थ करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आम्ही हवेत विरणारे आश्वासने न देता जे पूर्ण होतील तेच आश्वासने देतो आणि ते काम पूर्णत्वाकडे नेतो. त्यामुळे जो काही विकास झाला त्याबद्दल मतदार संघातील मतदार समाधानी आहेत. मात्र जो काही विकासाचा अनुशेष शिल्लक आहे तोही भरून काढण्यासाठी यापुढेही भरपूर काम करायचे आहे, असा विश्वास आमदार नमिता मुंदडा ह्या प्रचारादरम्यान बोलून दाखवत आहेत.
भाजपाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा ह्या केज विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. या दरम्यान त्यांनी बोलताना सांगितले की, मागच्या पंचवार्षिक मध्ये जी काही संधी मिळाली त्या संधीच सोनं करत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघातील केज, आंबेजोगाई तालुक्यासाठी आणि नेकनूर परिसरातील अनेक गावातील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. या निधीतून गावातील रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील अशा विविध प्रकारची कामे माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत मतदार संघातील असे एकही गाव नाही की त्या गावांमध्ये काही ना काही निधी दिला नाही. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने कोण विरोधक आणि कोण आपले समर्थक ? हे न पाहता सरसकट विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून आम्ही काम करत आहोत असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून रस्ते, वीज, पाणी यासाठी तर भरभरून निधी दिलाच आहे. परंतु पर्यटन विकास निधी अंतर्गत अनेक देवस्थानांनाही निधी आणण्याचे काम केलेले आहे. मात्र यापुढेही मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा मानस असून मतदारांनीही सुरू असलेल्या विकास कामांना चालना देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नमिता मुंदडा ह्या करत आहेत.