#Election
122 मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात फेर निवडणूक घ्या…..!
https://strawpoll.com/wAg3Qw0E2y8
(केज विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी ? वरील लिंकवर क्लिक करून मत नोंदवा आणि सहभाग घ्या)
बीड दि.२१ – संपूर्ण परळी शहरावर गुंडांचे राज्य आहे. जिल्ह्याचे प्रशासन हे पालकमंत्र्यांना मॅनेज झालेले आहे. त्यामुळे निवडणूक निष्पक्षपणे पार पडली नसून सदरील मतदारसंघात फेर निवडणूक घेण्याची मागणी राशपचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती खुद्द राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यातील परळी मतदारसंघांमध्ये बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि याच पार्श्वभूमीवर राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, परळी मतदारसंघांमध्ये संपूर्ण मतदार हा दहशतीखाली आहे. मुक्तपणे त्यांना मतदान करता येत नाही. परळी मतदारसंघांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक झालेली नाही. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले आहे. धाक दाखवून मतदारांना भयभीत करण्याचे काम काही गुंडांनी केले तर काही जणांना पालकमंत्र्यांच्या गुंडांनी मारहाणही केलेली आहे. त्यामुळे परळी व परळी तालुक्यातील सुमारे 122 मतदान केंद्रावर फेर निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले. तसेच त्यांच्याच गुंडांनी मारहाण, तोडफोड केली अन आमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असल्याचे स्पष्ट केले.
परळी मतदारसंघांमध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून बिहारला लाजवेल अशी गुंडगिरी सध्या पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते. कुठल्याच प्रकारचा कायदा या गुंडांकडून पाळल्या जात नाही. संपूर्ण परळी मतदारसंघावर राज्य त्यांचेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मुक्तपणे वावरताही येत नाही आणि लोकशाहीने दिलेला अधिकार बजावताही येत नाही. त्यामुळे निवडणूक झालेली ही अत्यंत बोगस पद्धतीने झाली असून फेर निवडणूक पोलीस बंदोबस्तात घेण्यात यावी अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे सांगितले. तसेच मतदाना दिवशी एडवोकेट माधव जाधव यांनाही गुंडांनी मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रारही निवडणूक आयोग तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना केली असल्याचे स्वतः माधव जाधव यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.