आपला जिल्हा
सद्भावना पद यात्रेत बहुसंख्येने उपस्थित रहा – राहुल सोनवणे

बीड दि.७ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना पद यात्रेचा शुभारंभ बीड जिल्ह्यातून होत आहे. महिलादिनी सदरील दोन दिवसीय पदयात्रेला सुरुवात होत असून केज तालुक्यातील मस्साजोग येथून बीडकडे सद्भावना यात्रा मार्गस्थ होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सद्भावना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.
मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक सलोखा असंतुलित झालेला आहे. मात्र सामाजिक सलोखा बिघडणं हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुढाकार घेत सद्भावना पद यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून तसेच खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना पदयात्रेचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे. आठ मार्च रोजी सकाळी साडेआठ
वाजता केज तालुक्यातील मस्साजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांना आदरांजली अर्पण करून सद्भावना पद यात्रेला सुरुवात होणार आहे. सदरील पद यात्रेमध्ये सर्वच स्तरातील व सर्वच समाजातील नागरिक सहभागी होणार आहेत. पद यात्रेचा पहिला मुक्काम नेकनूर येथे होणारा असून दुसऱ्या दिवशी नेकनुर ते बीड अशी पदयात्रा निघणार आहे.
दरम्यान मस्साजोग येथून सकाळी साडेआठ वाजता निघणाऱ्या सद्भावना पदयात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.