पुणे | गेल्या आठवड्यापासून पुण्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग घटला असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. शहरात राबवण्यात आलेला ‘मिशन झिरो’ उपक्रम प्रभावी ठरतोय.
पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि महापालिकेतर्फे ‘मिशन झिरो पुणे’ उपक्रम राबवला जातोय. 23 जुलैपासून शहरातील 11 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपक्रमाला सुरुवात झाली.
शहरातील हॉटस्पॉटमध्ये ठरलेल्या भागात अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणं, रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणं, फिरत्या दवाखाण्यांची संख्या वाढविणं, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणं, रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणं तसंच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार या सूत्रांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरतोय.
रावसाहेब दानवेंच्या दाव्यावर बाळासाहेब थोरतांचा पलटवार……!
मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा केलाय.
राहुल गांधींना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्ही देखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो, असं दानवे म्हणालेत.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रस्त्यावरील आंदोलनाची सवय नाही, असं भाजप नेते आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, रावसाहेब दानवेंविषयी फार बोलण्याची गरज नाही. याउलट राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळत असल्याचं थोरात म्हणाले.
केज शहरांतर्गत रस्त्याची तक्रार, रास्ता रोकोचा इशारा….!
अहमदपूर-मांजरसुमबा महामार्गाचे केज शहर अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कंपनीने कामातील सातत्य व कामाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार केज विकास संघर्ष समितीने केज तहसीलदार यांच्यासह एच पी एम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असून संबधित कामाचा दर्जा व सातत्य यात सुधारणा न केल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
केज शहर अंतर्गत कामात सातत्याचा अभाव दिसत असून कानडी चौक व उमरी रस्त्याचा तोंडावर कंपनीने नवीन पाईपलाईन व केबल टाकण्यासाठी कच्चे खोदकाम करून अर्धवट सोडले आहे.
या दोन्ही रस्त्याच्या तोंडाशी तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करावा तसेच केज शहर अंतर्गत काम सुरू असताना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी रस्त्यावर पाणी मारण्यात यावे अशी मागणीही समितीने केली आहे. वरील मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशाराही केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.