आपला जिल्हा
केजमध्ये तरुणावर ब्लेडने वार
एकाविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा
डी डी बनसोडे
October 15, 2020
केज दि.१५ – रस्त्यामध्ये उभा राहण्याच्या किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून एका २५ वर्षीय तरुणाच्या पाठीवर व हातावर ब्लेडने वार केल्याची घटना केज शहरातील क्रांतीनगर भागात घडली. याप्रकरणी केज पोलिसात एक जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील क्रांतीनगर भागातील किरण विजय भुइंगळे ( वय २५ ) हा तरुण ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ८.३० त्याच्या घरासमोर उभा असताना उमेर मुस्तफ फारोकी ( रा. रोजा मोहल्ला, केज ) हा त्याच्या जवळ गेला. त्याने मी रस्त्याने जात असताना तू रस्त्यामध्ये का उभा राहतो असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून किरण याच्या कानाखाली चापट मारली. त्यामुळे किरण याने उमेर याच्या गच्चीस धरले असता उमेर याने हातातील ब्लेडने किरण याच्या पाठीवर व डाव्या हातावर वार केले. यात किरण हा रक्तबंबाळ होऊन जखमी झाला. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास किरण भुइंगळे याने दिलेल्या फिर्यादीवरून उमेर मुस्तफ फारोकी याच्याविरुध्द केज पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे हे पुढील तपास करत आहेत.
खा. डॉ. प्रीतम मुंडेंकडून हंगे कुटुंबियांचे सांत्वन
केज दि.१५ – तालुक्यातील हदगाव येथील झुंबर उर्फ केशव शिवाजी हंगे या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून १० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बुधवारी ( दि. १४ ) रात्री गावात जाऊन हंगे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
परतीच्या पावसाने केज तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडल्याने हदगाव येथील झुंबर उर्फ केशव शिवाजी हंगे या तरुण शेतकऱ्याचा बळी गेला होता. या घटनेनंतर बुधवारी रात्री खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी हदगाव या गावी भेट देऊन हंगे कुटुंबियांची भेट घेतली. सांत्वन करून हंगे कुटुंबाला धीर दिला. तर शासनाकडून मिळणारी चार लाख रुपयांचा मदत लवकरात लवकर कुटुंबास देण्याच्या सूचना ही त्यांनी प्रशासनास दिल्या.
यावेळी जेष्ठ नेेते नंदकिशोर मुंदडा, युुवा नेते तथा सभापतीपती विष्णु घुले, विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, सुरेंद्र तपसे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, डोका येथील सरपंच गोरख भांगे, हदगावचे सरपंच सुनील वायबसे, बापूराव घाडगे, बालासाहेब चंदनशिव, संभाजी गायकवाड, पांडुरंग भांगे, धीरज वनवे, बप्पा डोंगरे, बंडू गदळे, गणेश वायबसे, माजी सैनिक वायबसे हे उपस्थित होते.