देशविदेश
दिवसभरातील ठळक बातम्या……!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) च्या उमेदवारांना परीक्षेसाठी त्यांच्या आवडीचे शहर बदलण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. परीक्षेसाठी शहर बदलण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर होती मात्र, सीबीएसईने आता याची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलांबाबत सवलतीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊन काळात घरोघरी किंवा प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाणे शक्य नसल्याने सरासरीप्रमाणे वीजबिले पाठवण्यात आलेली. एकीकडे पगारात झालेली कपात किंवा गेलेली नोकरी आणि भरमसाठ वीजबिले यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलाच त्रस्त झालेला. अशात आशेचा किरण होता तो भरमसाठ वीजबिलांमध्ये अपेक्षित अशी कपात. मात्र, आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास नकार दिला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) माध्यमातून वेतन सबसिडीवर केंद्राचे 6,000 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे आणि पुढील दोन वर्षांत दहा लाखांपेक्षा जास्त नोकर्या निर्माण करण्यात मदत मिळू शकते. रोजगार निर्मितीचे लक्ष्य वेतन पिरॅमिडच्या खालच्या स्थानावर आहे.
दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दिवाळीच्या दिवसांत घातपात करण्यासाठी दहशतवादी आले होते. पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी कारवाई केली.
उत्तर प्रदेशात मन हेलावणारी घटना घडली आहे. एका सात वर्षाच्या मुलीचे यकृत काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून मुलाच्या हव्यासापोटी गावातील एका दांपत्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.