बीड दि.२३ – अनेकांनी केलेली मदत, अनेकांचे आशीर्वाद आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येईल असे वाटले होते.मात्र नियतीच्या गर्भात वेगळेच होते. सुमारे एक महिन्यापासून जीवन मरणाशी सुरू असलेला संघर्ष थांबला असून प्रशांतला सर्वांचा अखेरचा निरोप घ्यावा लागला.
केज तालुक्यातील साळेगाव येथील कैलास वरपे यांचा चि. प्रशांत कैलास वरपे हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला अत्यंत हुशार आणि चुणचुणीत मुलगा मागील महिन्या पासून मेंदूच्या क्षयरोगाने आजारी होता. त्याच्यावर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, लातूर आणि नंतर प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. वळसंगकर यांच्या एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायंन्स सोलापूर येथे उपचार सुरू होते.
कैलास वरपे यांच्या घरची परिस्थिती गरिबीची व हलाखीची असल्यामुळे सोलापूर येथील औषधोपचारा साठीचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. त्यामुळे काहींनी त्यासाठी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करताच अनेक दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आपापल्या परीने त्याना औषधोपचारासाठी मदत केली. तसेच अनेकांनी तो दुरुस्त व्हावा म्हणून प्रार्थना देखील केल्या. परंतु त्याची परिस्थिती गंभीर होती. त्याच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. त्याने औषधोपचारास प्रतिसाद दिला नसल्याने गेली अनेक दिवसापासून प्रशांत हा कोमातच होता. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश आले नाही. आणि शेवटी दि. २२ नोव्हेंबर रविवार रोजी रात्री ११.३० वा. प्रशांत वरपे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान प्रशांत दुरुस्त व्हावा म्हणून अनेकांची त्याच्या कुटुंबाला केलेली मदत; सर्वांचे आशीर्वाद आणि त्याची जगण्याची झुंज शेवटी निष्फळ ठरली आणि प्रशांतच्या मृत्यूने वरपे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कैलास वरपे यांना तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. प्रशांतवर दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व गावावर शोककळा पसरली होती.