केज दि.२४ – शहरातील नेहरू नगर भागात एका चोरट्याने घरफोडी करून तीन मोबाईल आणि नगदी १५ हजार रुपये असा ३५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. तर तालुक्यातील बनकारंजा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दोन अंगठ्या आणि ३५ हजार रुपये असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
बनकारंजा येथील लक्ष्मण भानुदास लांब या शेतकऱ्याच्या मुलाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या ( किंमत – ३० हजार रुपये ) आणि नगदी ३५ हजार रुपयांची रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या पूर्वी घडली. लक्ष्मण लांब यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी घरफोडीची घटना केज शहरातील नेहरू नगरमध्ये घडली असून फिरोज शहबाज शेख यांच्या घरात प्रवेश करून आवड्या खाजा शेख याने २० हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल आणि पेटीत ठेवलेली १५ हजार रुपयांची रक्कम, असा ३५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजीच्या पहाटे २.३० वाजेच्या पूर्वी घडली. फिरोज शेख यांच्या फिर्यादीवरून आवड्या शेख याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.