राजकीय
शरद पवार हे सरकारचे रिमोट कंट्रोल नाहीत………!
मुंबई दि.२७ – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनातून वाचकांच्या भेटीला आली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले असून उद्धव ठाकरेंनीही त्या प्रश्नांना जशास तशी उत्तरे दिली आहेत. त्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपला चांगलाच इशारा दिला आहे.
मुलाखती दरम्यान उद्धवजी या सरकारला बाप किती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,” बाप हा एकच असतो आणि आईही एकच असते. हो तुम्हाला शरद पवारांबद्दल विचारायचे आहे का, तर शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत रिमोट कंट्रोल नाहीत”.
आम्ही तिन्ही पक्ष वेगवेगळे आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. शरद पवारांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मीही त्यांचे मार्गदर्शन घेतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.तसेच हे सरकार अकरा दिवसांत पडणार असे भाकित अनेकांनी केले होते. यासंदर्भात राऊत यांनी ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की,”उत्तर देताना तसं बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत. आता हे सरकार नक्कीच पाच पर्ष पूर्ण करणार”.
दरम्यान नितेश राणे यांनी या मुलाखती संदर्भात ट्विट करत सडकून टीका केली असून त्यांनी ही मुलाखत अर्णब गोस्वामी यांना द्यायला पाहिजे होती व ती कंगणाच्या ऑफिस मध्ये सुशातसिंह राजपूत या संदर्भात व्हायला हवी होती असे म्हटले आहे.