बीड दि.५ – चळवळ आणि संघर्ष ह्याच बळावर सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना झालेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.