क्राइम
उमरी येथे घरफोडी ; २ लाख ३५ हजाराचा ऐवज लंपास…….केज तालुक्यातील घटना…….!
केज दि.६ – अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कोंडा तोडून घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले २ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ३५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील उमरी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उमरी येथील राहुल लिंबराज यादव यांचे गावातील हनुमान मंदिराजवळ घर आहे. ५ डिसेंबर दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान राहुल यादव यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. आतमध्ये अडकवलेली चावी घेऊन त्यांनी दुसऱ्या खोलीचे कुलूप उघडून खोलीत ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील २ लाख रुपयांची रोकड आणि एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक – एक ग्रॅमच्या दोन अंगठ्या असा २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यादव यांचे कुटुंब रात्री उशिरा घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. राहुल यादव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.