आपला जिल्हा
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूस दोन वर्षे तर पतीस एक वर्ष कारावासाची शिक्षा
माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
डी डी बनसोडे
December 14, 2020
बीड दि.१४ – दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी माजलगाव येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालय अरविंद एस. वाघमारे यांनी माजलगाव येथील विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून व सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या सासूस कलम 306, 498 (अ) अंतर्गत दोषी धरून दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व पतीस कलम 498 (अ) अंतर्गत दोषी धरून एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी शिवाजी मारोती सोळंके यांनी फिर्याद दिली की माझी मुलगी नामे कोमल हिचे लग्न माजलगाव येथील हनुमंत नारायण सिरसट यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. दिनांक 16/ 9/ 2015 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास माझे मालक गौतम सोळंके यांना यांनी मला फोन करुन कळविले की तुमची मुलगी कोमल ही जास्त भाजलेली असून तिला इलाज कामी शासकीय दवाखाना आंबेजोगाई येथे शरीक केले आहे. दरम्यान मी आंबेजोगाई येथे सरकारी दवाखान्यांमध्ये गेलो आणि मुलीस पाहिले व काय झाले म्हणून विचारले असता, तिने मला सांगितले की, मला माझी सासू शकुंतला नारायण सिरसट ही नेहमीच टोचून बोलत असे व नेहमी शिवीगाळ करत होती. तसेच तिने मला आज रोजी जास्त प्रमाणात बोलल्याने मला राग सहन न झाल्याने रागाच्या भरात घरात ठेवलेली रॉकेल कॅन अंगावर ओतून पेटवून घेतले. घडलेल्या प्रकरणाबाबत विवाहितेच्या वडिलांनी तिची सासू नामे शकुंतला नारायण सिरसट, हनुमान नारायण सिरसट व सासरा नारायण केशव सिरसट सर्व रा. मठ गल्ली माजलगाव यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुरनं 103/ 2015 कलम 205, 504, 498 (अ) 34 भादवी अन्वये जबाब दिला. सदर प्रकरणाचा तपास सपोनि देवकर यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुराव्यांच्या आधारावर अंतिम दोषारोपपत्र माननीय न्यायालयास सादर केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी क्रमांक एक व दोन यांच्याविरुद्ध सबळ पुरावा दिसून आल्याने माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. यातील आरोपी शकुंतला नारायण शिरसाट यास कलम 306, 498 (अ) अंतर्गत दोषी धरून दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व आरोपी हनुमान नारायण शिरसाट यास कलम 498 (अ) अंतर्गत दोषी धरून एक वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी क्रमांक तीन नारायण केशव शिरसाठ यास निर्दोष मुक्त केले आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ऍड. रणजीत वाघमारे व अजय तांदळे यांनी मांडली तर पैरवी चे कामकाज पोलीस हवालदार जे.एस.वावळकर यांनी पाहिले.