शेती
व्हाट्सएपच्या माध्यमातून भाजीपाला विक्री, राऊत यांचा यशस्वी प्रयोग………!
बीड दि.२० – व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली तर कुठल्याही क्षेत्रात बहुतांश वेळा यश मिळते. आणि असाच एक प्रयोग यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे. वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली येथील सदाशिव राऊत यांच्याकडे दीड एकर शेती आहे. 2014 पासून ते सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला लागवड करतात.यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना कुटुंब जगवणं कठीण झालं होतं. मात्र, त्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग निवडला आणि भाजीपाला घेणं सुरु केले. तेव्हापासून 11 जणांचं कुटुंब चालवून वर्षाकाठी लाखों रुपायांचा नफा मिळवत आहेत.
मागणीप्रमाणे पुरवठा……!
सेंद्रीय भाजीपाल्याला बाजारात चांगले दर मिळत नसल्याने त्यांनी विक्री करण्यासाठी वाशिम शहरातील डॉक्टर, वकील,अधिकारी यांचा एक व्हाट्सएप ग्रुप तयार करून त्यांना मागणीप्रमाणे घरपोच भाजीपाला देत आहेत. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत असून, ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे.
सदाशिव राऊत यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड करत असताना विदेशी भाजीपाला घेणे सुरू केले. यामध्ये लेटूस, रेडकॅबिज, आणि ब्रोकोली या तीन प्रकारच्या विदेशी भाज्या ते घेतात. राऊत यांनी विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केला आहे. या भाज्यांना पुणे, मुंबईला तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र, वाशिममध्ये 120 रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.