केज दि.२२ – केज उपजिल्हा रुग्णालय परिसरातील वसाहतीत राहत असलेल्या कर्मचाऱ्याच्या घराचा कोंडा तोडून चोरी झाल्याची घटना घडली असून यामध्ये रोख २२ हजार रकमेसह सुमारे २६ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दहा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर संतोष रामकृष्ण शेळके हे कर्मचारी (ब्रदर) कुटुंबियांसह राहतात. मात्र मागच्या पंधरा दिवसांपासून शेळके यांचे वडील आजारी असल्याने घराला कुलूप लावून ते अंबाजोगाई ला गेलेले होते.
दरम्यान सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञाताने शेळके यांच्या घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुटकेस मध्ये ठेवलेले नगदी २२ हजार, किमती साड्यासह लहान मुलांचा गल्लाही घेऊन पोबारा केला. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे यांनी पंचनामा केला असून संतोष शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करत आहेत.