राजकीय
उद्या तीन ऐवजी साडेपाच वाजेपर्यंत भरता येणार ग्रामपंचायत निवडणूक अर्ज…….! ऑफलाईन ही स्वीकारले जाणार अर्ज……!
बीड दि.29 – माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक २३/१२/२०२० ते दिनांक ३०/१२/२०२० असा आहे. या कालावधीत संगणकप्रणालीव्दारे एकूण ३,३२,८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक २८/१२/२०२० रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक ३०/१२/२०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वरील निर्णयाच्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची व्यापक प्रसिध्दी स्थानिक पातळीवर देण्यात यावी असे सुचवण्यात आले आहे.
दरम्यान पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये RO login मधून भरुन घेण्यात यावेत असे आदेध किरण कुरुंदकर (सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निर्गमित केले आहेत.