केज दि.१३ – विहिरीचे पाणी तुला देणार नाही म्हणत पुतन्यांनी सख्या चुलत्याला दगडाने मारहाण करीत दोन दात पाडले. भावाने व भावजयीने ही लाथाबुक्याने मारहाण केल्याची केज – मांजरसुंबा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी केज पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील विठ्ठल दगडू केदार हे नोकरीनिमित्त केज शहरातील शिक्षक कॉलनी भागात वास्तव्यास आहेत. त्यांची गावाकडे जमीन आहे. शेतातील विहिरीचे पाणी तुला देणार नाही अशी कुरापत काढून त्यांचा पुतण्या संतोष रामदास केदार याने दगड फेकून त्यांच्या तोंडावर मारल्याने विठ्ठल केदार यांचे दोन दात पडले. तर दुसरा पुतण्या अशोक रामदास केदार याने ही दगड नडगीवर मारून जखमी केले. तर त्यांचा भाऊ रामदास दगडू केदार आणि भावजयी गवळणबाई रामदास केदार या दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करीत मुक्कामार दिला. त्यांनी जीवे मारण्याची धमकी ही दिली. ही घटना अकरा जानेवारी रोजी सात वाजेच्या सुमारास केज शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा रस्त्यावरील यशवंत हॉटेलच्या बाजूला घडली. १२ जानेवारी रोजी रात्री विठ्ठल केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.