कोविशिल्ड लसीचे वितरण प्रत्येक जिल्ह्यासाठी सुरू झाले आहे. येत्या 16 तारखेपासून फ्रँटलाईन कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 17640 डोस मिळणार असून केज तालुक्यासाठी 1083 डोस मिळणार आहेत. दरम्यान केज येथील उपजिल्हा रुग्णालयात 16 तारखेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तालुक्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे लसीकरण होणार आहे. सदरील मोहिमेत दररोज 100 जणांना म्हणजेच एकूण 11 दिवसांत लस दिली जाणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तीन कक्षाची स्थापना करण्यात आली असून लस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास 30 मिनिटे निगरानीखाली ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाची सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली.