#Corona
100 पैकी 13 जणांनीच घेतली लस, अल्प प्रतिसाद……!
मुंबई दि.२० – कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र असलेल्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून यादीतील १०० लाभार्थ्यांपैकी केवळ १३ आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आले. जे.जे.सह कामा आणि जीटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जेजेतील लसीकरण केंद्रावरच पाठविण्याचा प्रस्ताव रुग्णालयाने राज्य आरोग्य विभागाकडे सादर के ला आहे.
कोव्हॅक्सीन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून वैद्यकीय चाचण्याअंतर्गत आपत्कालीन वापरास परवानगी दिलेली आहे. परंतु लशीची परिणामकता आणि सुरक्षितता याबाबत साशंकता असल्याने अजूनही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास कचरत आहेत. पहिल्या दिवशी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी लस घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेत लस घेतल्याने पहिल्या दिवशी लसीकरण झालेल्यांची संख्या ३९ नोंदली गेली. परंतु मंगळवारी सकाळी ९ पासूनच लसीकरण कक्षात शुकशुकाट होता. दिवसभरात १३ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असून तेही रुग्णालयातील कर्मचारी होते.