क्राइम
नेट बँकिंगद्वारे २ लाख ८९ हजाराची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेतली, केजच्या विद्यार्थ्याची फसवणूक……!
डी डी बनसोडे
January 20, 2021
केज दि.२० – एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या खात्यावरून अज्ञात व्यक्तीने नेट बँकिंगद्वारे २ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार केज शहरात घडला आहे. याप्रकरणी केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील माधव नगर भागातील अक्षयकुमार हनुमंत देशमुख हा पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याचे एसबीआय बँकेच्या केज शाखेत खाते ( खाते क्र. ३४१६३४७०७६२ ) असून या खात्यावर त्याच्या वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली २ लाख ८४ हजार ४९९ रुपयांची रक्कम टाकली होती. त्याला ६ जून २०२० रोजी मोबाईल फोन पे ऍपवर कॅश बँकेचे नोटिफिकेशन आले आणि त्यात वेगवेगळ्या फोन नंबरच्या लिंक आल्या. या लिंकवर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यावरून ९० हजार ७९८ रुपयांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. नंतर त्यास फोन करून समोरच्या व्यक्तीने मोबाइलवर टीम व्हीवर हे ऍप इंस्टॉल करून घेण्यास सांगितले. शिवाय नेट बँकिंग अपडेट करून देतो असे म्हणत आणखी नेट बँकिंगद्वारे १ लाख ९८ हजार २०२ रुपये ट्रान्सफर घेतले. त्यानंतर अक्षयकुमार देशमुख याने ७ जून २०२० रोजी मो. नं. ७७३९१९१२२९ व ८६९७४०३५५९ या नंबर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने फोन पे चा एजंट असल्याचे आणि तुमचे खाते हॅक झाले असल्याचे सांगून १० जून २०२० पर्यंत तुमची खात्यावरून कपात झालेली रक्कम परत करू असे सांगितले. मात्र आतापर्यंत नेट बँकिंगद्वारे परस्पर ट्रान्सफर करून घेतलेली २ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम मिळाली नाही. पुन्हा सदरचे मोबाईल नंबर ही बंद करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. २० जानेवारी २०२१ रोजी अक्षयकुमार हनुमंत देशमुख या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास बीड येथील सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे.