क्राइम
चारचाकी गाडीसाठी विवाहित महिलेचा छळ, केज पोलिसांत गुन्हा दाखल…….!
पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
डी डी बनसोडे
January 22, 2021
केज दि.२२ – चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन का येत नाहीस ? या कारणावरून एका २० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसात तिचा पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील लाखा माहेर असलेल्या पल्लवी प्रदीप ननवरे ( वय २० ) हिचा बार्शी ( जि. सोलापूर ) येथील प्रदीप महादेव ननवरे यांच्यासोबत मागील तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला काही दिवस चांगले नांदविल्यावर तिचा पती प्रदिप ननवरे, सासरा महादेव ननवरे, सासू शोभा ननवरे, ननंद ज्योती मिसाळ तसेच सुरज मिसाळ यांनी संगनमत करून चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी पल्लवी हिच्या मागे तगादा लावला. तिने तेवढी रक्कम घेऊन येण्यास नकार दिल्याने वरील सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तरी ती माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन येत नसल्याने तिच्यावर संशय व्यक्त करीत शिवीगाळ करून मारहाण केली. शेवटी त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पल्लवी ननवरे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रदिप ननवरे, सासरा महादेव ननवरे, सासू शोभा ननवरे, ननंद ज्योती मिसाळ, सुरज मिसाळ यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.