क्राइम
केज तालुक्यात महिलेचा विनयभंग, तर जमिनीच्या वादातून मुलाने केली वडिलांना मारहाण……!
डी डी बनसोडे
January 23, 2021
केज दि.२३ – एका २२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. पिडितेने ओरडून विरोध केल्याने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी केज पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका २२ वर्षीय महिलेचा पती हा शेतात कामाला गेला होता. तर पीडित महिला ही लहान मुलीला घेऊन घरातील काम करीत होती. हीच संधी साधून आरोपी अशोक शाहुराव तांदळे ( रा.बानेगांव ता. केज ) याने शनिवारी ( ता. २३ ) रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घरात घुसून तिचा पदर ओढुन व वाईट हेतुने हात धरुन लज्जास्पद बोलून विनयभंग केला. पिडितेने ओरडून विरोध केल्याने अशोक याने पीडितेला चापटा बुक्याने मारहाण केली. याचवेळी रामेश्वर ज्ञानोबा हांगे याने तेथे येऊन तिला मारून टाक असे म्हणत त्याने ही चापटाबुक्याने मारहाण केली. पीडितेचा पती मदतीला धावून आला असता त्याला ही दोघांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून अशोक तांदळे व रामेश्वर हांगे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
जमिनीच्या वाटणीवरून एकाचे डोके फोडले
केज दि.२३ – जमीन वाटून का देत नाहीत ? या कारणावरून मुलाने वडिलांना बेल्टने मारहाण केली. तर पुतण्याची बाजू घेऊन भावाने सख्या भावाचे लोखंडी गजाने मारहाण करून डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील रामेश्वरवाडी येथे घडली. याप्रकरणी मुलासह भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रामेश्वरवाडी येथील रामेश्वर ज्ञानोबा हांगे ( वय ५५ ) हे शनिवारी ( दि. २३ ) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरासमोर होते. याचवेळी त्यांचा मुलगा किशोर रामेश्वर हांगे याने जमीन वाटून का देत नाहीत, आर्धी जमीन वाटून दे असे म्हणत शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने वडील रामेश्वर हांगे यांच्या पाठीवर आणि हातावर मारहाण केली. तर पुतण्याची बाजू घेऊन आलेल्या नवनाथ ज्ञानोबा हांगे यांनी ही सखा भाऊ रामेश्वर हांगे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून डोके फोडले. जमीन वाटून न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांची पत्नी महानंदा रामेश्वर हांगे व अशोक तांदळे यांनी सोडवासोडव केली. रामेश्वर हांगे यांच्या फिर्यादीवरून किशोर हांगे, नवनाथ हांगे यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक शिवाजी सानप हे पुढील तपास करत आहेत.
केजमध्ये ‘सोरट’ जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक
केज दि.२३ – शहरात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांनी बसस्थानकाच्या पाठीमागील भागातून ‘सोरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.
केज पोलीस ठाण्याचे फौजदार श्रीराम काळे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलीस शिपाई गित्ते हे शनिवारी ( दि. २३ ) रोजी दुपारी ४ वाजता केज शहरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना बसस्थानकाच्या पाठीमागील भागात ‘सोरट’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी छापा मारला असता जुबेर मुस्ताक फारोकी, जिशान फारुक शेख ( दोघे रा.केज ) हे दोघे ‘सोरट’ नावाचा जुगार चिञावर पैसे लावुन खेळवित असताना मिळून आल्याने त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडील ८५० रुपये आणि सोरट जुगाराचे साहीत्य जप्त केले. पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांच्या फिर्यादीवरून जुबेर फारोकी, जिशान शेख या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.