”असे” अडकवल्या जात होते तरुणांना जाळ्यात, अन उकळल्या जायचे लाखो रुपये…..!
पोलिसांचा सावधानतेचा इशारा.......!
बीड दि.24 – युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळून फसवणूक करणारी टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं असा काही प्रकार तुमच्यासोबतही घडत असेल तर सावधान राहा आणि वेळीच पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी इथला रहिवासी 28 वर्षीय राहुल विजय पाटील यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचा तपास केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पांघरी नवघरे इथल्या म्होरक्यासह पाच जणांची टोळी डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके रा. सातमैल (वाशिम रोड अकोला), संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे (राहणार आगीखेड ता . पातूर), हरसिंग ओंकार सोळंके (रा .चांदुर ता . अकोला) या तीन जणांसह एक महिला जळगाव खान्देश तर दुसरी अकोला इथली आहे.