आरोग्य व शिक्षण
केज उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणास सुरुवात, ”हे” ठरले पहिले मानकरी…….!
केज दि.२५ – मागच्या १६ तारखेला संपूर्ण देशात कोरोना लसीकरणास सुरवात झाली. त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातही सुरुवात झाली होती. मात्र केज येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या दिवशी लसीकरण सुरू झाले नव्हते. मात्र आज सकाळी १०.३० वाजता प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली असून रक्तपेढीचे आरोग्य कर्मचारी श्रीकृष्ण नागरगोजे हे पहिले मानकरी ठरले.
केज उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी सकाळी लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविकेंना लस देण्यात येत आहे. त्यानुसार सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी श्रीकृष्ण नागरगोजे हे उपजिल्हा रुग्णालयात लसीचे पहिले मानकरी ठरले.
दरम्यान कुठलीही मनात भीती न बाळगता आरोग्य कर्मचारी लसीकरण करून घेत असून आज दिवसभरात सुमारे 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली. लसीकरणासाठी वेगवेगळे तीन कक्ष स्थापन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टर्स च्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्वतः अधीक्षक डॉ. संजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, डॉ. नंदकुमार नेहरकर, डॉ. बालासाहेब सोळंके, डॉ. चाटे यांच्यासह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.