धान खरेदीसाठी 1 लाख 72 हजार कोटींची तरतूद…..…! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याची घोषणा…..!
बीड दि.1 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (FM Nirmala Sitharaman) 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. केंद्र सरकारचा या प्रयत्नाद्वारे शेतकऱ्यांचा उत्पन्न दुपप्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रानं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांचा परिणाम काय होणार पाहावे लागणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या भाषणात केंद्र सरकार शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जाहीर केले. निर्मला सीतारमण यांनी युपीए सरकारच्या तीनपट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं प्रत्येक क्षेत्रात डाळ, गहू, धानाची एमएसपी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली असं सांगितलं.
दरम्यान निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी दिल्याची माहिती दिली. 2021 मध्ये एमएसपीसाठी 75 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सीतारमण म्हणाल्या. बाजार समित्या देखील कृषी पायाभूत विकास निधीचिया कक्षेत आणल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात 5 मोठे मासेमारी हब तयार केले जाणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट वाढवण्याचं ध्येय असल्याचं सांगितले.
1 लाख 72 हजार कोटींची तरतूद
निर्मला सीतारमण यांनी गहू खरेदीसाठी 75 हजार 60 कोटी, डाळ खरेदीसाठी 10 हजार 503 कोटी आणि धान खरेदीसाठी 1 लाख 72 हजार 752 कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली. मोदी सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. त्याअंतर्गत देशातील आणखी 1000 बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-एनएएम) जोडल्या जाणार आहेत. जेणेकरून शेती मालाची खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक मजबूत होऊ शकेल. याअंतर्गत शेतकरी जवळील बाजारातून आपले उत्पादन ऑनलाईन विकू शकतात. व्यापारी कुठूनही त्यांच्या उत्पादनासाठी पैसे पाठवू शकतो. या माध्यमातून मागील वर्षी 1000 बाजार समित्या जोडल्या गेल्या होत्या.