1658 विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांना अनुदान देण्यास सरकार अनुकूल…..!
मुंबई दि.१२ – विनाअनुदानित शाळांसाठी खुशखबर असून या शाळांना मान्य केल्याप्रमाणे २० टक्के अनुदान देण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अर्थमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यानुसार, विनाअनुदानित शाळांच्या याद्या बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी केले आहे.
राज्यांतील विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदान २०२०च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा निधी वितरित करण्यात आलेला नाही.हा निधी मिळावा, यासाठी गेल्या १३ दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी संबोधित केले.
शिक्षकांबद्दल राज्य सरकार संवेदनशील असून विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील १ हजार ६२८ शाळांना अधिक २० टक्के अनुदान वाढवून मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे एकूण ४० टक्क्यांवर पोहोचणार आहे. तर नव्याने घोषित झालेल्या 1 हजार ६५८ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे.