30 टक्के वाहन परवाने बोगस……!
नागपूर दि.१५ – अन्य देशांच्या तुलनेत भारतात वाहन परवाने घेण्याची पद्धत खूपच सोपी आहे. आरटीओ अधिकार्यांची कार्यपद्धतीही ‘दिसला पैसा की मार ठप्पा’, अशी आहे. याचाच परिणाम म्हणून देशात 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली.
सर्व बोगस परवाने रद्द करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी आपल्याच विभागाच्या कारभाराचा पंचनामा करत अधिकार्यांची खरडपट्टी काढली. बहुतांश अधिकार्यांच्या कार्यपद्धतीमुळेच बोगस वाहन परवाने काढण्यात आले. ते आता रद्द करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान देशात सध्या महागड्या गाड्यांनाच एअर बॅग लावल्या जातात. त्यामुळे अपघातावेळी गाडीतील लोकांचे जीव वाचू शकतात. मात्र यापुढे इकॉनॉमी वाहनांनाही एअरबॅग मिळतील, असे गडकरी यांनी सांगितले.