संजय राठोड आमच्या संपर्कात – अजित पवार
मुंबई दि.१७ – संजय राठोड गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार म्हणाले.
आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असंच घडलं, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.
दरम्यान या प्रकरणात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा पदावरून हटवायचं हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्याचा भाग आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ते शिवसेनेचे नेते आहेत. त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईल. माझं स्वत: एक त्रयस्त म्हणून मत आहे. जोपर्यंत चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडासा संयम ठेवा, असा सल्लाही अजित पवारांनी मीडियाला दिला.
तृतीयपंथीयांचा इशारा……!
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला अकरा दिवस झाले तरी या प्रकरणाचं गूढ अद्याप उकलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ज्या कथित मंत्र्यांवर आरोप झालेत त्यांनीही पुढे येऊन कोणताच खुलासा केलेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर तृतीय पंथी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने पूजा चव्हाण प्रकरणात लक्ष घालावं, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा तृतीय पंथीयांनी दिला आहे.
ज्यांच्यावर आमच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच अत्याचार होतो हे दुर्दैवी असल्याचं मत तृतीय पंथीय प्रबोधनकार प्रीती माऊली लातूरकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारनं पूजा चव्हाण प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अन्यथा तृतीय पंथीय समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रीती माऊली लातूरकर यांनी दिला आहे.