नांदेड दि.3 – राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्र. ३६१ मधील भुसंपादनात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून आयुक्तानी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१मध्ये ४४० कोटींपर्यंत भूसंपादनाचा मोबदला देण्यात आलेला आहे. मात्र यातील १०० कोटींचा मोबदला शासकीय जमिनींच्या मोबदल्यात देण्यात आला आहे अशी तक्रार शिवसेना नेते व सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.या संदर्भात त्यांनी पुरावेही सादर केले आहेत.
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात भूसंपादन निवाडे आणि सुनावणी स्थगित करण्यात आली होती. मात्र, स्थगितीनंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावण्या करुन गैरफायदा घेत शासकीय जमिनी खाजगी मालकीत दाखवत मोबदला देण्यात आला आहे अशी तक्रार मारावार यांनी केली आहे.