कोरोना काळात बालकांवर होत आहेत दूरगामी परिणाम…….!
नवी दिल्ली दि.6 – कोरोनामुळे जगभरात अनेक घटकांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा थेट परिणाम जसा शारीरिक आरोग्यावर होत आहे, तसाच काहीसा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होत आहे. कोरोना महासाथीचा भारतातील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचं युनिसेफनं गुरुवारी स्पष्ट केलं आहे.
बहुतांश शाळांना टाळे असल्याने मुलांना शिक्षण मिळणं तसंच समवयस्क किंवा मित्र-मैत्रिणींसोबत थेट संवाद साधण्यात अवघड झाले आहे.तसेच जागतिक संस्थेच्या मते, कोरोना साथीपूर्वी भारतातील अंदाजे 50 दशलक्ष मुलांना मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने त्रास होत होता. कोरोनाची साथ सुरू झाल्याने व सर्वजण घरातच बंदिस्त झाल्याने 7 पैकी 1 किंवा जगभराचा विचार केला तर सुमारे 332 दशलक्ष मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे. लॉक डाउन काळात मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढल्याचे दिसून आले आहे. मुले आणि मुलींच्या शारीरिक संरक्षणाइतकीच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आपल्याला प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचं, युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी सांगितलं.
दरम्यान कोरोना काळात युनिसेफने चाईल्डलाईन, सिव्हील सोसायटी नेटवर्क, जिल्हा बाल संरक्षण संस्था, बाल देखभाल संस्था आणि वन स्टॉप सेंटरच्या 8000 हून अधिक कार्यकर्त्यांना मुलांना मानसशास्त्रीय प्रथमोपचार देण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. सुमारे 17 राज्यांमधील अंदाजे 4,46,180 मुले, पौगंडावस्थेतील मुलं, पालक किंवा केअरगिव्हर्स यांना मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्रीय पाठबळाच्या अनुषंगाने मदत दिली जात आहे. राज्य सरकार आणि सीएसओ यांच्या भागीदारीतून युनिसेफने 7,00,000 पेक्षा अधिक स्थलांतरीत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभ आणि सामाजिक संरक्षण मिळवून दिलं आहे. तसंच संरक्षित क्षेत्रांमध्ये कोरोनाची जोखीम, संवाद, समुदायाचा सहभाग, लिंग आधारित हिंसा बाल मजुरी आणि बालविवाह यावर काम केलं जात असल्याचे सूत्रांनी सांगितलं.