केज दि.९ – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची साठवणूक करून छुप्या मार्गाने विक्री मारणाऱ्या किराणा दुकानावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा मारून ४१ हजार १०० रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी किराणा दुकानदाराविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
युसुफवडगाव येथील किराणा दुकानदार शिवरुद्र रामभाऊ चोपणे हे दुकानात गुटख्याची साठवणूक करून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती बीडच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ८ मार्च रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी किराणा दुकानाची छाडती घेतली असता दुकानात ३१ हजार ६८० रुपयांचे राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे २४६ पुडे, ७ हजार ९२० रुपयांचे एक्सेल क्षिरे वन जाफरानी जर्दाचे २४६ पुडे, १ हजार ५०० रुपयांचे एक्का गुटख्याचे सहा पुडे असा ४१ हजार १०० रुपयांचा माल आढळून आला. त्यांनी हा माल जप्त केला. तर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा लोकांच्या आरोग्यास हानिकारक आहे हे माहीत असताना जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवणूक करून छुप्या मार्गाने विक्री करीत होते. अशी फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी दिल्यावरून किराणा दुकानदार शिवरुद्र रामभाऊ चोपणे याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे हे पुढील तपास करत आहेत.