सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही मोह आवरला नाही……! उपअभियंता चतुर्भुज…….!
माजलगाव दि.३१ – पद मोठे पगार गलेलठ्ठ असतानाही क्षणिक मोह न आवरल्याने आयुष्यभर केलेल्या सेवेवर पाणी सोडण्याची दुर्बुद्धी सुचतेच कशी? याचे आश्चर्य वाटते. आणि याचेच उदाहरण म्हणजे सेवानिवृत्ती उंबरठ्यावर आलेली असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना एका रस्त्याच्या कामात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.३१) पकडले.ही कारवाई माजलगावमध्ये करण्यात आल्याची माहिती असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
एच.आर. गालफाडे असे त्या उपअभियंताचे नाव असून रस्त्याच्या कामाचे तीन लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रादाराकडून सहा हजारांची लाच स्विकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून सध्या बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लाचखोरीचे अनेक गुन्हा उघडकीस आले आहेत.यात आता थेट उपअभियंत्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील अभियंता हे केज जि. प. बांधकाम विभागात सुमारे पाच वर्षे कार्यरत होते त्यानंतर त्यांची माजलगाव ला बदली झाली होती व नुकताच त्यांच्याकडे डेप्युटी इंजिनिअर म्हणून पदभार आला होता. आणि सेवानिवृत्तीही उंबरठ्यावर आलेली होती. मात्र क्षणिक मोहापायी सहा हजारांसाठी चतुर्भुज होण्याची वेळ आली.