#Corona
आ. नमिता मुंदडानी स्वारातीमध्ये घेतली आढावा बैठक…….!
अंबाजोगाई दि.१ – ( पांडुरंग केंद्रे) : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डाॅक्टरांची संख्या वाढवा व रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या
अशा सूचना आ.नमिता मुंदडा यांनी अधिष्ठातायांना केल्या. तसेच आ. मुंदडा यांनी कोरोना कक्षात जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या, रुग्णांच्या असलेल्या तक्रारी व विविध अडचणीची दखल घेण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी गुरुवार दुपारी स्वाराती रुग्णालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुक्रे , उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, कोविड कक्षाचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार अधिक्षक डॉ. राकेश जाधव विभाग प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. नितीन चाटे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विश्वजित पवार, अधिसेविका भताने यांच्यासह जेष्ठ कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक सारंग पुजारी खलील मौलाना, शेख ताहेर, वैजनाथ देशमुख, अॅड संतोष लोमटे, प्रशांत अदनाक, डॉ. निशिकांत पाचेगावकर , कल्याण काळे, गोपाळ मस्के, आनंत आरसुडे इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या, अंबाजोगाई व परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या पाहिजेत. कोरोना कक्षात उपचार देताना डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे ती दुर करा तसेच रुग्णालयातील २७ व्हेंटिलेटर्स बंद पडल्यामुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत, याची दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या.