#Corona
चाचण्या वाढल्या बाधितांचे प्रमाण ही वाढले, अंबाजोगाईत दिवसाकाठी होतात हजारापेक्षा जास्त चाचण्या……!
पांडुरंग केंद्रे/अंबाजोगाई
अंबाजोगाई दि. ३ – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होतात. दररोज किमान एक हजारापेक्षा जास्त चाचण्या सुरू आहेत. प्रत्येक चाचणीसाठी १२००ते १२५०रु खर्च येतो. हा सर्व खर्च शासनामार्फत होतो. त्यामुळे शासनाला कोरोनाच्या चाचण्यांसाठी १२ ते साडेबारा लाख रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
बीड जिल्ह्यात एकही खाजगी प्रयोगशाळा नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व चाचण्या शासनाच्या वतीने केल्या जातात. २० जुन २०२० मध्ये अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालय कोरोना विषाणू प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेची क्षमता दररोज २०० चाचण्या करण्याची आहे, तरीही २४ तास सेवा देत दररोज एक हजारापेक्षा चाचण्या केल्या जातात. प्रयोगशाळेच्या प्रारंभापासून आजपर्यंत १ लाख २१ हजार ३७८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १२ हजार १४३ जण कोरोना बाधित निघाले आहेत. बीड जिल्ह्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या फक्त अंबाजोगाईतच होतात. तसेच रॅपिड अँटिजन टेस्ट ची सुविधा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या वतीने व्यापारी, कर्मचारी, शिक्षक बँकेतील कर्मचारी अशा विविध लोकांच्या चाचण्या करण्यासाठी केलेली सक्ती व वाढती रुग्णसंख्याही वाढुच लागली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील संपूर्ण चाचण्या शासकीय यंत्रणेच्या होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना कसलीही अर्थिक अडचण भासत नाही याचा जिल्हा वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात १४,७२६ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यात एकुण २२५९ जण कोरोना बाधित निघाले. तर अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर ८२३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात एकुण ११५७ बाधित निघाले आहेत तसेच अँटिजन टेस्ट मधुन १११२ बाधित समोर आले आहेत.